Showing posts with label व्यवस्था. Show all posts
Showing posts with label व्यवस्था. Show all posts

Saturday, March 25, 2017

शेतमालाचा भाव आणि ग्राहकांची मानसिकता


बच्चुभाऊच्या शेतातली संत्री विकण्याच्या निमित्ताने आज ८ दिवसांपासून पुण्याच्या मार्केट यार्डात आहे. ग्राहक १०० ला दोन किलो म्हटलं की अडीच किलो देता का म्हणतात, अडीच म्हटलं की तीन ची मागणी. मापात स्वतःहून एक-दोन संत्रा जास्त टाकला तरी अजून एक टाका ची फर्माईश होते. आणि वरून जाता-जाता अजून एक घेवू का खायला म्हणण्याइतका लोचटपणा लोक दाखवतात. आणि हे बहुतांश लोकांच्या बाबतीत. विशेषतः महिला, चाळिशीच्या पुढचे सर्वजन. दोन कारण स्पष्ट वाटतात, एक, बाजारात बसलेल्या माणसाबद्दल निर्माण झालेला प्रचंड अविश्वास. समोरचा माणूस शक्य तितकं आपल्याला कमी देण्याचा प्रयत्न करणार आहे, त्यामुळे निघेल तितकं काढू ही मानसिकता. आणि दुसरं महत्वाचं कारण वाटतं ते म्हणजे, शेतकऱ्यांपासून असलेल्या अंतरामुळे निर्मांण होणारी स्वाभाविक असंवेदनशिलता. ग्राहकाला फक्त व्यापारी आणि निघेल तितकं काढण्याचा खेळ दिसतो. त्यामुळे शेतकऱ्याला हा माल तयार करायला किती खर्च आला असेल? त्याला या भावात विकलेलं परवडत असेल का? असे प्रश्नच खूप कमी लोकांना पडत असतील असं वाटतं. आणि ग्राहकाच्या बाजूने असणारी आर्थिक निकडही याला जबाबदार असेल का? तर असं दिसतं की हे प्रकार खूप गरीब वर्गातला ग्राहक करतो असं नाही. उलट वर उल्लेख केलेला "लोचटपणा"चा प्रकार मला मध्यमवर्गीय वयस्क लोकांमध्येच अधिक आढळला; अगदी असे लोक ज्यांची मुलं आयटी कंपन्यांमध्ये काम करतात. यापुढे जाऊन हेही खरं की, अगदी खूप पैसेे कमावणाऱ्या घरातील लोकांनाही जमेल तितकं वाचवायची गरज वाटत असेल. पण इतक्या टोकाच्या गरजा आल्या कुठून? बहुतेक सर्वांना मोठं घर, गाडी अशा गोष्टी गरजा वाटतात, त्यामुळे कितीही प्रमाणात असलेला पैसा कमीच भासतो. एकूण शेतमालाची ग्राहक अधिक, रास्त किंमत मोजायला का तयार नाही यामगच्या एका गुंतागुंतीच्या समीकरणाचा काहीसा अंदाज येतो.

Monday, February 1, 2016

ब्राझीलमधील लोकलढा, आजच्या जागतिक प्रश्नांचा चेहरा आणि दुसरा आंतरराष्ट्रीय 'राजकीय संघटकांसाठी राजकीय प्रशिक्षण' वर्ग आॅक्टोबर २०१५

गणेश बिराजदार, धरामित्र वर्धा

[सुचना : प्रस्तुत लेख हा विस्तृत शोधनिबंध नसून पावरपाॅंइट प्रेसेंटेशनच्या साह्याने केलेल्या मांडणीचा सारांशलेख आहे . येथे दिलेली माहिती आणि आकडेवारी प्रत्यक्ष वस्तुस्थितीपेक्षा वेगळी असू शकते, त्यामुळे आवश्यक तेव्हा ती इतर स्त्रोतांमधून पडताळून घ्यावी (जरी बहुतेक आकडेवारी ही विविध शोधनिबंधांमधून पडताळणी केलेली आहे, आणि संबंधीत शोधनिबंधांचा संदर्भ जोडलेला आहे). येथे संदर्भ जोडलेले शोधनिबंध इतकेच दर्शवितात की, संबंधीत मुद्यांवर अधिक माहितीसाठी वाचकाच्या माहितीस्तव ते जोडले आहेत, मात्र त्यांचा विस्तृत अभ्यास या लेखासाठी केला गेलेला नाही. लेखातील बहुतांशी माहिती ही पोर्तुगीज भाषिक ब्राझीलमधील घडामोडींसंदर्भात असल्यामुळे बरेच संदर्भलेख हे पोर्तुगीज भाषेत आहेत, मात्र पोर्तुगीज लेखांचे चांगले इंग्रजी भाषांतर गुगलच्या साहाय्याने होऊ शकते.]

चाैकट १

दिनांक २६ आॅक्टोबर ते १२ डिसेंबर या दरम्यान ग्वारारेमा, ब्राझील येथे, 'राजकीय संघटकांसाठी राजकीय प्रशिक्षण' हा सात आठवड्याचा वर्ग पार पडला. या वर्गाचा उद्देश, त्याची पार्श्वभूमी आणि त्यातून एक प्रशिक्षणार्थी म्हणून माझे झालेले शिक्षण याची मांडणी या लेखात केलेली आहे.

Friday, December 19, 2014

तळ्यात? की मळ्यात?

सायतखर्ड्याचे शंभू कर्णू मोहुर्ले. 2001-02 साली धरामित्र च्या सेंद्रिय शेती प्रकल्पाच्या निमित्ताने सेंद्रिय शेतीला सुरुवात केली. आणि खूपच कमी अवधीत ती इतक्या उत्तम पद्धतीने केली की, केवळ गावोगावचे शेतकरीच नव्हे, तर देश-विदेशातील शेती अभ्यासकांनी त्यांच्या शेतीला भेट दिली. 2010 साली त्यांनी पुन्हा रासायनिक खतांचा वापर सुरु केला. कारण? त्यांच्या शब्दात, “जमीन आठ-नऊ वर्षे चांगली सांभाळली होती, त्यामुळे थोडंसं खतपाणी करुन भरपुर उत्पन्न काढले, तर लग्नकार्य वगैरे मोठी कामे काढता येतील असा विचार केला. बॅंक बॅलन्स जमवला होता, तो एकदाचा काढून घेतला.” त्यामुळे रासायनिक खतांचा वापर केल्यानंतर पहिल्या वर्षी कापसाचे उत्पन्न निघाले एकरी 20 क्विंटल. आता कमी होत-होत चाैथ्या वर्षी ते एकरी 16 क्विंटल वर आले आहे. शिरोलीचा तरुण शेतकरी विषाल सांगतो, तो एका क्षेत्रात तीन वर्षे कमीत-कमी रसायने वापरुन सोयाबीनचे पिक घेतो आणि चाैथ्या वर्षी जास्त उत्पन्नासाठी म्हणून कापसाचे पिक घेतो. पंगडीचे प्रयोगशील शेतकरी भीमराव चिंचोलकरांना विचारलं, भाऊ तुम्ही धरामित्र चा प्रकल्प थांबल्यानंतर अजुन सेंद्रिय शेती करताय का? भाऊंचं उत्तर, “सायब, सांगाले म्हणजे.. सेंद्रिय मध्ये मोडत नाय, रासायनिक मध्ये नाय मोडत, अन् कायच्यात मोडत नाय, तर मग तुमाले मग मी सांगाचं कसं नेमकं? अन् बनवा-बनवी करायचा आपल्यायले उपाव नाय?” पण त्याबद्दल काही हरकत नाही, फक्त आम्हाला तुम्ही कशा पद्धतीने करता हे समजुन घ्यायचं आहे, असं सांगितल्यावर भीमराव भाऊ म्हणाले, “आता म्या कणाय गेल्या वर्षी... म्या खत देल्लं बा, तुरीले फक्त नाय देल्लं, पर ह्या कणाय पराटीला देल्लं. आण माहा फलाट कसा ऱ्हायते सायब, बिलकुल फारच कमी हिशोब ऱ्हायते. तरी ह्या सालायले की नाय सायब, लोकायच्या मानानं मी हिशोबात हाव.” ते सांगतात, या घडीला गावात अशा विचाराने शेत करणारे शेतकरी चार आणे असतील. शिरोळीचे शेतकरी सांगतात, गावात पूर्ण सेंद्रिय पद्धतीने करणारे शेतकरी फार नाहीत, पण एकुण रासायनिक शेतीतील अनुभवांमुळे शेतकऱ्यांचा ओढा आपोआप कमी होत आहे. शंभू मोहुर्ले सांगतात, त्यांचं पाहुन गावातील काही शेतकऱ्यांनी खतांचा वापर कमी केला होता, मात्र त्यांनी स्वतःच रासायनिक खते वापरायला सुरुवात केल्यामुळे लोक ती कल्पना विसरुन गेले. गावात जास्तीत जास्त खत टाकायची आणि जास्तीत जास्त उत्पन्न काढायची, अक्षरशः स्पर्धा आहे.
ही मोजकी उदाहरणं काय सांगतात? पहिली गोष्ट, या वर्षी काळ्या आईनं मला अपेक्षेपेक्षा जास्त दिलं म्हणुन मीही तिला जास्तीच्या पैशात बाहेरुन विकत घेऊन शेनखत टाकलं, असं सांगणारे सुभाष शर्मा आणि शंभू मोहुर्लेमध्ये काय फरक असेल, तर काहीतरी दिल्याशिवाय काही मिळणार नाही, हा व्यवहार सुभाषजी कसोशीनं पाळतात. गंमत म्हणजे, शंभूभाऊना याची जानीव नाही असं नाही. पण इतकंच की, भरपुर उत्पन्न, मोठं लग्न म्हणजेच प्रतिष्ठा, प्रतिष्ठा म्हणजे सुख या साऱ्या गोंधळात तो व्यवहार सांभाळणं कुठे तरी राहुन जातं.
दुसरी गोष्ट, ही सगळी शेती करण्याच्या बाबतीतली व्यवहारिक धोरणाची उदाहरणं आहेत, अडचण इतकीच की, ती पुरेशी व्यवहारिक नाहीत. अर्थात, शेतकऱ्यांना मागच्या 50 वर्षातल्या अनुभवातुन ही जानीव झालेली आहे, की निव्वळ ओरबाडत राहुन शेती करता येणार नाही, पण त्याच वेळेला, माझ्या गरजा भागण्यापुरतं तरी मला शेतातुन मिळत राहिलंच पाहिजे. त्यामुळे सेंद्रिय शेती म्हणजे, खतं आणि रसायनं सोडुन करायची फकिरी इतकेच जोपर्यंत सेंद्रिय शेतीबद्दलचे सामान्य शेतकऱ्यांचे आकलण राहील तोपर्यंत शंभूभाऊ सारख्या कितीतरी शेतकऱ्यांचं तळ्यात-मळ्यात सुरुच राहील. आणि त्यातील अधिक हानीकारक गोष्ट म्हणजे, त्याचा वर त्यांनीच वर्णन केल्याप्रमाणे इतर शेतकऱ्यांवर होणारा परिणाम. म्हणुन सेंद्रिय शेतीचा प्रसार करणारी यंत्रणा म्हणुन आपल्यालाच मुळात हा व्यवहारिकपणा अधिक चांगल्या पद्धतीने परिभाषित करुन तो शेतकऱ्यांपर्यंत पोहचविण्याची गरज आहे. हा विचार अगदी नियोजनपूर्वक बिंबविण्याची गरज आहे, "प्रश्न हा नाही की, शेतात कृत्रीम रसायनं टाकायची की नाही? प्रश्न हा आहे की, अजुन 40 वर्षे पिक घेत राहायचं की, 4 वर्षात शेतीचं वाळवंट करायचं? ते कसं करायचं, हे मात्र तुम्ही ठरवू शकता.”
जी.एस. विश्वनाथ,
धरामित्र, वर्धा
gsbirajdar516@gmail.com