Saturday, March 25, 2017

शेतमालाचा भाव आणि ग्राहकांची मानसिकता


बच्चुभाऊच्या शेतातली संत्री विकण्याच्या निमित्ताने आज ८ दिवसांपासून पुण्याच्या मार्केट यार्डात आहे. ग्राहक १०० ला दोन किलो म्हटलं की अडीच किलो देता का म्हणतात, अडीच म्हटलं की तीन ची मागणी. मापात स्वतःहून एक-दोन संत्रा जास्त टाकला तरी अजून एक टाका ची फर्माईश होते. आणि वरून जाता-जाता अजून एक घेवू का खायला म्हणण्याइतका लोचटपणा लोक दाखवतात. आणि हे बहुतांश लोकांच्या बाबतीत. विशेषतः महिला, चाळिशीच्या पुढचे सर्वजन. दोन कारण स्पष्ट वाटतात, एक, बाजारात बसलेल्या माणसाबद्दल निर्माण झालेला प्रचंड अविश्वास. समोरचा माणूस शक्य तितकं आपल्याला कमी देण्याचा प्रयत्न करणार आहे, त्यामुळे निघेल तितकं काढू ही मानसिकता. आणि दुसरं महत्वाचं कारण वाटतं ते म्हणजे, शेतकऱ्यांपासून असलेल्या अंतरामुळे निर्मांण होणारी स्वाभाविक असंवेदनशिलता. ग्राहकाला फक्त व्यापारी आणि निघेल तितकं काढण्याचा खेळ दिसतो. त्यामुळे शेतकऱ्याला हा माल तयार करायला किती खर्च आला असेल? त्याला या भावात विकलेलं परवडत असेल का? असे प्रश्नच खूप कमी लोकांना पडत असतील असं वाटतं. आणि ग्राहकाच्या बाजूने असणारी आर्थिक निकडही याला जबाबदार असेल का? तर असं दिसतं की हे प्रकार खूप गरीब वर्गातला ग्राहक करतो असं नाही. उलट वर उल्लेख केलेला "लोचटपणा"चा प्रकार मला मध्यमवर्गीय वयस्क लोकांमध्येच अधिक आढळला; अगदी असे लोक ज्यांची मुलं आयटी कंपन्यांमध्ये काम करतात. यापुढे जाऊन हेही खरं की, अगदी खूप पैसेे कमावणाऱ्या घरातील लोकांनाही जमेल तितकं वाचवायची गरज वाटत असेल. पण इतक्या टोकाच्या गरजा आल्या कुठून? बहुतेक सर्वांना मोठं घर, गाडी अशा गोष्टी गरजा वाटतात, त्यामुळे कितीही प्रमाणात असलेला पैसा कमीच भासतो. एकूण शेतमालाची ग्राहक अधिक, रास्त किंमत मोजायला का तयार नाही यामगच्या एका गुंतागुंतीच्या समीकरणाचा काहीसा अंदाज येतो.