Monday, July 6, 2015

"खोली" हरवलेली शेतं..

आज सकाळी-सकाळी धरामित्र च्या शाश्वत शेती प्रकल्पाचे समन्वयक, आमचे कोंबे काका येवून एक अनुभव सांगतात, “गणेश, आज एका शेतकऱ्याकडे गेलो होतो. त्याच्या शेतात गेल्यावर तो म्हणाला, साहेब मला कळत नाही, शेजारच्या तीन फलाटात लावलेली ज्वारी उगवून आली, पण या फलाटातली तुम्ही दिलेली ज्वारी मात्र उगवून नाही आली. बहूतेक बियाणं खराब निघालं.” कोंबे काकांनाही प्रश्न पडला, असं कसं काय झालं. पण इतक्यात त्यांचं या गोष्टीकडे लक्ष गेलं की, ज्या शेेतातील ज्वारी उगवून आली नाही, तिथे जमिनीत चिरे पडलेले दिसत नव्हते. त्यांनी शेतकऱ्याला विचारलं, “तुम्ही ह्या फलाटात वखरामागे (शेतातील गवत काढण्याचे अवजार) पेरणी केली ना?” शेतकरी, “हो, तुम्हाला कसं काय कळलं?” तेव्हा कोंबे काकांनी त्या शेतकऱ्याला सांगितलं की काकरीमागे (पेरणीच्या पुढे-पुढे, बी खोल जावे यासाठी चिरा पाडणारे अवजार) पेरणी केली तर ती पुरेशी खोल जाते, पण वखरामागे ती केली तर पुरेशी खोल जात नाही. त्यामुळे बियाण्याला पुरेशी अोल मिळत नाही. पण शेतकऱ्याने जिथे चांगले उगवून आले नाही त्या ठिकाणी गवत खूप आलेले होते म्हणून काकरीमागे पेरणी करण्याएेवजी थेट वखरामागे पेरणी केली. त्यामुळे ज्या भागांमध्ये काकरीमागे पेरणी झाली होती तेथे ज्वारी उगवून आली व दुसरीकडचे पिक मात्र वाया गेले. हे सांगता-सांगता कोंबे काकांनी बियाणे पेरणीसाठी एक मोलाचा ढोबळ नियम सांगितला. तो म्हणजे, “खोलीत टाक, पण 'अोली'त टाक.”

No comments:

Post a Comment