Saturday, March 7, 2015

ज्वारी पीक विमा (नि)योजना




ज्वारी पीक विमा (नि)योजनाभाग 1

दि. 20 फेब्रुवारी 2015
शेतकरी: दीपक बर्डे
पत्ता: मु. बावापूर, पो. हमदापूर, ता. समुद्रपूर, जि. वर्धा

दीपकभाऊ, हे खर्‍या अर्थाने प्रयोगशील शेतकरी आहेत असे म्हणता यॆईल. आज प्रयोगशीलता म्हटलं की बाजारानुसार नवे पीक घेणे म्हणजे चांगला भाव मिळेल इतकाच त्याचा अर्थ होतो. पण दीपकभाऊ हे या “अर्था”च्या गणीताच्या पलीकडे जाऊन निसर्गात होत चाललेल्या चढ-उतारांना सामोरे जाण्यासाठी शेतीत काय बदल करावे लागतील याच्या शोधात कायम असतात.

दर वेळेस त्यांच्या शेतात गेलं की काही तरी नवीन बघायला व शिकायला मिळणार हे आता नक्की पटलंय. आजही तेच झाले. गेली 2-3 वर्षे शेतकर्‍यांना असा अनुभव येत आहे की जानेवारी-फेब्रुवारी आला की गारपीट तरी होणार नाही तर अवकाळी पाऊस तरी. आता यावर उपाय काय?
या प्रश्नाने हताश होवून न बसता दीपकभाऊंनी या वर्षी एक प्रयोग चालू केला आहे.

दीपकभाऊ हे त्यांच्या रब्बी ज्वारीसाठी प्रसिद्ध. आता जानेवारीत समजा ऐन कणसावर ज्वारी आलेली असताना निसर्गाने फटका दिला तर काय? अख्खंच्याअख्खं पीक गेलं वाया! मग त्यांनी या वेळेस त्यांच्या पेरणीत थोडा बदल करायचा ठरवलाय. त्यांनी ज्वारी तीन टप्प्यांमध्ये लावली. पहिली पेरणी ऑक्टोबर, दुसरी एका महिन्यानंतर नोव्हेंबरमध्ये व तिसरी अजून एका महिन्याने डिसेंबरमध्ये.

या मागचा त्यांचा विचार हाच की गारपीट, अवकाळी पाऊस या गोष्टी काही दोन-तीन महिने नाही चालत. जानेवारी ते मार्चच्या दर्म्यान कधी तरी एकदा होवू शकते. मग अशा वेळी जी ज्वारी कणसावर असेल तिचेच फक्त नुकसान होईल, बाकीच्या वाचतील.

आता यावर कोणी प्रयोगशाळेत आयुष्य घालवलेला “तज्ञ” म्हणेल की हा तर मूर्खपणा झाला. ज्वारीचा एक विशिष्ट पेरणीचा कालावधी असतो. असं करून कसे चालेल? त्या तज्ञाचं म्हणणं एखाद वेळेस बरोबरही असेल. हा प्रयोग अपयशी ठरला हे दीपकभाऊ, व त्यांच्यामार्फत आपणा सर्वांना, याद्वारे कळेल देखील. पण येथे महत्त्वाच्या नोंदी घेण्याजोग्या बाबी या एक प्रयोगामार्फत अविष्कार करणे नसून, खालील आहेत असे आपण मानले पाहिजे:
1. शेती विज्ञान व निसर्गचक्र याबाबत जागृक राहून दोन्हीतील समन्वय साधण्यासाठी कायम प्रयत्नशील असणे.
2. प्रयोगशाळा किंवा विद्यापीठांमध्ये शेती प्रयोग बन्दिस्त करण्याऐवजी प्रत्यक्ष शेतांमध्ये असे प्रयोग करणे.
3. प्रयोगशाळेतील किंवा कृषी सेवा केंद्रातील तय्यार उपाय सांगून सांग-कामे बनविण्याऐवजी लोकांमध्ये दीपकभाऊंसारखा जागृक, वैज्ञानिक व प्रयोगशील दृष्टीकोन रुजविला पाहिजे.
4. या शेतकर्‍यांच्या प्रयोगशीलतेची जबाबदारी ही केवळ त्या-त्या शेतकर्‍यांची नसून गावातील इतर लोक, ग्राहक, विद्यापीठे व शासकीय यंत्रणा या सर्वांची आहे हे लक्षात घेणे व या प्रयोगांदर्म्यान त्या शेतकर्‍यांच्या सोबत उभे राहणे. नुकसान झाल्यास त्यातून सामूहिकपणे मदतही करणे; कारण शेवटी फायदा झाला तर आपण तो सामूहिकपणे घेणारच आहोत!

ज्वारी पीक विमा (नि)योजना: भाग 2
दि. 4 मार्च 2015
शेतकरी: दीपक बर्डे
पत्ता: मु. बावापूर, पो. हमदापूर, ता. समुद्रपूर, जि. वर्धा

गेल्या आठवड्यात अवकाळी पावसाचा परत मारा बसला. दीपकभाऊंना लगेच फोन लावला की त्यांच्या शेतातील परिस्थिती काय?

त्यांच्या ज्वारी पीक विमा (नि)योजनेचा लाभ त्यांना मिळालेला ते सांगतात. त्यांची नेहमीप्रमाणे लावलेली ज्वारी कणसावर होती व त्यामुळे या पावसाने ती काळी पडलेली ते सांगतात. आणि प्रयोगाप्रमाणे कालावधी बदलून लावलेली ज्वारी मात्र पूर्णपणे सुरक्षित आहे!

आस्मानी संकटाने पोळलेल्या शेतकर्‍यांच्या बातम्यांमध्ये दीपकभाऊंचा शेती विचार व आचार नक्कीच आशा पल्लवित करून जातो!

No comments:

Post a Comment