Saturday, March 14, 2015

तज्ञ - अज्ञ भेदभाव, चला दूर करू...


ज्ञाना नाही कोणी वर्ज, जाती-वर्णाचे सोवळे ।
तज्ञ - अज्ञ भेदभाव, चला दूर करू ॥

दि. 13 मार्च 2015

·       तेरा शेतकरी. (दहा महिला, तीन पुरुष.)
·       शिक्षण: बारावी ते अंगठेबहद्दर.
·       विषय: उत्क्रांती व शेती विज्ञान.
·       फळ्यावरील काही टिपण: गुणसूत्रे – 23, जनुके – 38,000.
·       फर्षीवरील काही साहित्य: काही भाताच्या बिया. पेशी, डी.एन.ए., रानकोबी व इतर कोबीचे प्रकार, जेनेटिकली मॉडिफाईड जीव, अशा काहीशा गोष्टींचे रंगीत फोटो. दोन पत्त्यांचे कॅट.

काहीतरी गडबड वाटतेय नाही? पण हो, असेच होते आज पुण्यात झालेल्या गरीब डोंगरी संघटनेच्या बैठकीतील चित्र.

बैठकीला आलेला उत्क्रांती या विषयाचा अभ्यासक धनंजय ताराबाईंना सांगतो की जगातील सर्वात मोठा वैज्ञानिक, आइन्स्टाईन, असा म्हटलेला की जर एखादा विषय तुम्हाला तुमच्या आजीला समजावता आला नाही तर तो विषय तुम्हालाच समजलेला नाही असे मानावे.

धनंजयने ताराबाईंना जे सांगितले ते आज खरं तर “वैज्ञानिक”, “तज्ञांना” व राज्यकर्त्यांना सांगण्याची गरज आहे. शेतकर्‍यांवर तसाही आपण “अडाणी” असण्याचा शिक्का लावला आहेचे. त्यामुळे कोणत्या कार्यशेळेत ताराबाईंनी तज्ञांना, “आम्ही भात बंद करून उस लावू लागलो तर काही वर्षांनंतर जमिनीचा पोत कमी होणार नाही का? जनुकीय बदल केलेली पिके लावली तर निसर्गात असंतुलन तर निर्माण होणार नाही?” असे प्रश्न विचारल्यावर त्यांना, “तुम्हाला ते नाही समजणार” “आम्हाला इतर कोणी असे प्रश्न नाही विचारले या आधी, तुम्हीच कशा विचारता?” असे सांगून गप्प करणे यात काही नवल नाही. आणि याचाच मग धोरणपातळीवर परिणाम होतो. सामान्य माणसं, मग ते शेतकरी असोत वा ग्राहक, निर्णय प्रक्रियेतून सपशेल वगळले जातात व त्यांच्या वतीने “तज्ञ-शास्त्रज्ञ” मंडळी निर्णय घेवून त्यांच्यावर थोपवून टाकतात.

परंतु ही परिस्थिती बदलायची असेल तर विज्ञानाला तज्ञांच्या सोवळ्याबाहेर काढून सामान्य लोकांपर्यंत पोहोचवले पाहिजे. आणि त्या दिशेनेच एक पाऊल टाकण्याचा प्रयत्न म्हणजे आजची गरीब डोंगरी संघटनेसोबतची “उत्क्रांती व शेती विज्ञान” या विषयावरील बैठक.

उत्क्रांती (evolution), गुणसूत्रे (chromosomes), जनुक (genes), नैसर्गिक व कृत्रिम निवड (natural & artificial selection), इ. वैज्ञानिक संज्ञा 50 वर्षांच्या अंगठेबहद्दर शेतकरी महिलेस समजू शकत नाही अशी कोणास जर शंका असेल तर त्यांनी आजच्या बैठकीतील रोहिणी मावशींना नाहीतर ताराबाईंना जरूर भेटावे. त्यांचे सर्व भ्रम दूर होतील!

आजच्या बैठकीत धनंजयच्या सहाय्याने... नाही... धनंजयच्या तांत्रिकी माहिती व शेतकर्‍यांच्या रोजच्या जगण्यातील निरिक्षणे व अनुभवांच्या सहाय्याने आम्ही सर्वांनी “शेती अस्तित्वात कशी आली असावी? वनस्पतींना, जनावरांना आपल्या पूर्वजांनी कसे माणसाळवले (domestication)? एका रानकोबीपासून कोबीचे अनेक प्रकार कसे तयार झाले? एका देवभातापासून आपल्या रोजच्या खाण्यातील भाताच्या एक लाखाहून अधिक जाती कशा निर्माण झाल्या?” अशा तांत्रिक विषयांपासून ते “या ज्ञानाचे आपल्या दैनंदिन व सामाजिक जीवनात काय महत्त्व? वैविध्य जपले पाहिजे का? जनुकीय बदल केल्यावर एखादा जीव पर्यावरणासाठी अथवा माणसासाठी सुरक्षित राहतो का?” अशा अनेक सामाजिक विषयांपर्यंत विविध गोष्टींवर चर्चा केली व माहितीची देवाण-घेवाण केली.

या बैठकीच्या शेवटी सर्वांच्याच ज्ञानात काही ना काही नवीन भर पडली अशी अनुभूती सर्वांनाच झाली. या माहितीच्या जोरावर शेतकर्‍यांना जास्त डोळसपणे शेती करता यॆईल व त्यांना धोरणकर्त्यांना योग्य व टोकदार प्रश्न विचारता येतील. अशीच माहितीच्या देवाण-घेवाणाची प्रक्रिया या 13 शेतकर्‍यांपासून ते त्यांच्या 13 गावांपर्यंत पोहोचवायची असे सर्वांनी ठरवले आहे. यात धनंजयही अशा कार्यकर्त्यांना गावात बैठका घेताना कामाला यॆईल यासाठी पुस्तिकेच्या रूपात काही मजकूर तयार करेल असे ठरले आहे.

अशा पद्धतीच्या विकेंद्रित व पर्यायी ज्ञानाच्या देवाण-घेवाणाच्या प्रक्रिया आपण सर्वांनीच आपापल्या ठिकाणी सुरू करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कोणास ठाऊक, उद्या या बौद्धिक सशक्तीकरणाच्या वचक्याने “वातावरण बदल नाहीये होत, माणसात बदल होतोय” “कर्णाचा जन्म हे जनुकीय विज्ञान भारतात हजारो वर्षांपासून अस्तित्वात असण्याचे उदाहरण आहे” असली भंपक व जनतेची दिशाभूल करणारी वक्तव्ये करण्याआधी एखाद्या राष्ट्राच्या अध्यक्षांना शंभर वेळा विचार करावा लागेल!

3 comments:

  1. Wah!! Dil Khush ho Gaya..... Comrades!! :)

    ReplyDelete
  2. Great! धनंजय, हा लॆख वाचून मला लवकरच तुझा वर्ग attend कॆला पाहिजॆ असं वाटतंय! I will be waiting for it! :)

    ReplyDelete