Thursday, March 3, 2016

नागपूर बीजोत्सव २०१६ - लेखाजोखा


केवळ चर्चा आणि भाषणांचे स्वरूप मोडून प्रत्यक्ष प्रश्नाभिमूख, लोकांशी जोडणारा कार्यक्रम कसा आयोजीत करायचा या ध्यासाने आकार घेत असलेला 'नागपूर बीजोत्सव' दिनांक १९, २० आणि २१ फेब्रुवारी २०१६ दरम्यान विनोबा विचार केंद्र, नागपूर येथे पार पडला.मागील ३ वर्षापासून वेगवेगळ्या निमित्ताने आपला 'बीजोत्सवा'शी परिचय आहेच. एकीकडे मोन्सॅंटो सारख्या राक्षसी कंपन्या बियाण्यांचे उत्पादन आणि वापरावर एकाधिकारशाही निर्माण करू पाहत आहेत. विदर्भात होऊ घातलेल्या महाकाय बियाणे केंद्रासारख्या व्यवस्थांनी देशात आपले जाळे पसरू पाहत आहेत. याच वेळी पारंपारिक बियाणे जतन करून शाश्वत शेतीचा शेतीचा प्रसार करण्याचा, तसेच जास्तीतजास्त लोकांना रासायनिक शेतीचे दुष्परिणाम समजवून सांगत विषमुक्त अन्न मिळविण्यासाठी लोक आपल्या पातळीवर एकत्र येऊन आपल्या हक्कासाठी लोकलढा उभारू पाहत आहेत. अशाच प्रकारचा एक प्रयत्न म्हणजे 'नागपूर बीजोत्सव'. या कार्यक्रमाचा हा संक्षिप्त अहवाल.
Know your farmer, connect with producers (तुमच्या अन्नदात्याशी अोळख करा, उत्पादकांशी जोडून घ्या) अशी संकल्पना असलेल्या यावेळच्या बीजोत्सवात २३० सहभागींनी अधिकृतपणे नोंदणी केली. शिवाय कार्यक्रमाच्या ठिकाणी सुरू असलेल्या सेंद्रीय शेतमाल प्रदर्शन आणि विक्रीला नागपूरच्या विविध भागातून भेट देवून नागपूरकरांनी विषमुक्त अन्न आणि पिळवणूक मुक्त शेतीच्या या प्रवासात आपला सहभाग नोंदवला. यावेळी परंपरागत कार्यक्रमांच्या पद्धतींना फाटा देवून सर्व सहभागींना आपले अनुभव सांगता येतील आणि इतरांकडून शिकता येईल अशी सभागृहाची रचना ठेवली.

जनसंवाद मोहीम : एका हाताने टाळी वाजत नाही
बीजोत्सवाबाबत यावर्षी झालेला एक महत्वाचा निर्णय म्हणजे, केवळ प्रश्नावर तात्वीक चर्चा करण्यासाठी एकत्र यायचे नाही, तर त्या निमित्ताने प्रत्यक्ष कामसुद्धा करायचे. त्यानुसार सेंद्रीय शेती आणि विषमुक्त अन्नासंबंधी जागृती व्हावी आणि त्यातून या चळवळीला लोकसहभागाचे बळ मिळावे या उद्देशाने बीजोत्सव आयोजीत केला जात आहे, तेव्हा मुळात या विषयाच्या संदर्भात सामान्य लोकसंख्येमध्ये किती लोकांना या प्रश्नाबाबत काय माहिती आहे आणि काय माहिती नाही हे समजून घेणे महत्वाचे ठरेल म्हणून नागपूरवासीयांशी प्रत्यक्ष संवाद साधायचा असे ठरले. ठरल्याप्रमाणे सहभागींनी गटागटांमध्ये नागपूरातील वेगवेगळ्या भागात जाऊन लोकांशी या विषयावर संवाद साधला. तुमच्या मते सर्वात महत्वाचा व्यवसाय कोणता? आपण कोणते तेल खातो? आपला भाजीपाला, अन्नधान्य कोठून येते? तुम्ही शुद्ध अन्न कशाला म्हणता यासारख्या अनेक साध्यासोप्या प्रश्नातून जनमानस समजून घेण्याचा प्रयत्न केला. महत्वाचे म्हणजे हा उपदेश देण्याचा उपक्रम नसून दुमार्गी संवाद होता, त्यामुळे या कृतीला जनजागृती असे न म्हणता जनसंवाद म्हणून ती करावी हे पथ्य सर्वांनी पाळले.
या जनसंवाद मोहीमेनंतर सर्व सहभागींनी यादरम्यान आलेल्या विविध अनुभवांची एकमेकांशी देवानघेवान केली. या चर्चेतून आज एकंदर शुद्ध अन्न आणि पिळवणूकमुक्त शेतीसंबंधी कितपत जागृती आहे, आणि ती पुर्णपणे तयार व्हावी यासाठी अजून किती काम करण्याची गरज आहे, याचा थोडाफार अंदाज सहभागींना आला. यानंतरच्या सत्रांमध्ये विषमुक्त अन्न आणि शोषणमुक्त शेतीसाठी प्रत्यक्ष काम करणारे शेतकरी, ग्राहक समुह, विक्रेते, कार्यकर्ते यांच्या अनुभवांची मांडणी झाली.

शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी
पहिल्या सत्रामध्ये वर्ध्यातील शेतकरी गट मिळून चालवत असलेल्या बियाणे उत्पादक संस्थेचे चंद्रशेखर डोर्लीकर यांनी त्यांच्या संस्थेच्या कामाचा प्रवास मांडला. आज ही संस्था ३५ गावांमध्ये काम करते, आणि सोयाबीन, मूग, उडीद, तूर, चना अशा विविध बियाण्यांचे उत्पादन करून शेतकऱ्यांना पुरविले जाते. त्यांच्याकडे सुमारे ४० प्रकारच्या कापसाच्या जाती विकसित केलेल्या आहेत.

जनमंच – सिंचन शोध यात्रा, शेतकरी संघटन
अमिताभ पावडे यांनी 'जनमंच' या संघटनेच्या कामाचा परिचय करून दिला. 'जनमंच' च्या माध्यमातून सिंचन प्रकल्पांची अंमलबजावणी होत आहे की नाही याबद्दल जागल्याचे काम केले जाते. तसेच अलिकडच्या काळात शेतकऱ्यांचे संघटन व शेतीशी निगडीत प्रश्नांवर संघटनेच्या माध्यमातून लढा दिला जात आहे.

प्रश्नाची धोरणात्मक बाजू
कृषी विभागातील अधिकारी हेमंत चव्हाण यांनी महाराष्ट्राच्या सेंद्रीय शेती धोरणाविषयी सहभागींना माहिती दिली. यावेळी झालेल्या प्रश्नोत्तराच्या सत्रात आत्ता राज्य आणि केंद्रीय शासनाचे सेंद्रीय शेतीविषयक धोरणे आणि योजना काय आहेत, त्या योजनांचा लाभ घेण्यात काय अडचणी आहेत, तसेच अधिक प्रभावी योजनांसाठी कशा पद्धतीने आग्रह धरता येईल याविषयी माहिती दिलीविशेष म्हणजे डाॅ. चव्हाण स्वतः सेंद्रीय शेतीला प्रोत्साहन देणारे आहेत. नागपूरातील लेंद्रा पार्कमध्ये सुमारे ४०० शेतकऱ्यांच्या गटासोबत ते काम करतात.

झाडू आणि फडे
बीजोत्सवाच्या प्रत्येक कृतीचा उद्देश हा अधिकाधिक विकेंद्रीत आणि स्थानिक व्यवस्था निर्मितीच्या जवळ जाणारा असतो. परंपरेने आलेल्या काैशल्यांचे जतन करणे अधिकाधिक लोकांना रोजगार मिळवून देण्यासाठी लाभदायक ठरते. या विचाराला अनुसरून एका सत्रात प्रत्यक्ष परंपरेने झाडू तयार करण्याचा व्यवसाय करून उपजिविका भागविणाऱ्या वलणी गावच्या कारागिरांना निमंत्रित केले. राजेश खरे आणि ताराचंद तेलंगे यांनी सहभागींना शिंदीच्या पाणाचे झाडू कसे बनवावे याचे प्रशिक्षण दिले आणि एकंदर त्या व्यवसायातील अडचणी व आपण काय करू शकू याबद्दल आपले मत व्यक्त केले.

खादी - विकेंद्रीत कापड उत्पादन व्यवस्थेचे प्रतिक
वर्ध्यातील 'ग्राम सेवा मंडळा'च्या माध्यमातून 'कापूस ते कापड' ही प्रक्रिया अधिकाधिक विकेंद्रीत आणि शोषणमुक्त व्हावी यासाठी चरखा, खादीची निर्मिती आणि विक्री, देशी कापसाचे उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांना जोडून घेणे अशी विविध कामे केली जातात. 'ग्राम सेवा मंडळ'च्या करुणा फुटाणे यांनी संस्थेच्या कामाची वाटचाल आणि त्या कामाचा शोषणमुक्त शेतीशी संबंध कसा आहे याविषयी मांडणी केली.

शुद्ध तेल चळवळ
बाजारात आत कुठेही खात्रीचे भेसळमुक्त तेल मिळेल अशी खात्री राहिली नाही. आयात केलेले आणि केंद्रीकृत पद्धतीने तयार होणाऱ्या तेल उत्पादनामुळे शेतकऱ्यांची प्रचंड पिळवणूक होते. ही पिळवणूक आणि भेसळीवर आधारलेली व्यवस्था मोडीत निघावी यासाठी काही संस्था, व्यक्ती काम करत आहेत. त्यांच्यापैकीच एक नागपूरचे हर्षल अवचट यांनी ग्राहकांना एक्स्पेलरच्या साह्याने शुद्ध तेल पुरविण्याविषयी आपल्या अनुभवाची मांडणी केली. शिवाय त्या अंगाने एकंदर तेल उत्पादनाचे आर्थिक गणित, लहान व्यवसायिकांसमोरील आव्हाने आणि यावर आपण कशी मात करता येईल याविषयी मांडणी केली.

शेतीकडे चला
नागपूरातील काहीजण आपली नोकरी, व्यवसाय पूर्णपणे सोडून, किंवा त्यातून वेळ काढून शेती करायला सुरुवात केली आहे. हे त्यांना का करावेसे वाटले, त्याचे महत्व आणि त्यातून आलेला अनुभव याची प्रातिनिधीक मांडणी अश्विनी अाैरंगाबादकर, किर्ती मंग्रुळकर, हेमंत मोहरी यांनी केली.

बीजोत्सवाचे मुल्यांकन
बीजोत्सवातील सगळ्यात महत्वाचा टप्पा म्हणजे बीजोत्सवात घडलेल्या घडामोडींचा आढावा, चिंतन आणि पुढील कार्यक्रमांच्या दृष्टीने सुचना यासाठीचे सत्र. महत्वाचे म्हणजे, या सत्रात काय-काय करणे गरजेचे आहे याची भरगच्च चर्चा करण्याचे टाळून केवळ व्यक्ती किंवा संस्थेच्या पातळीवर मी स्वतःच्या शक्तीने काय करू शकतो हे सांगावे आणि त्याची जबाबदारी घ्यावी हे पथ्य पाळले गेले. त्यानुसार सहभागींनी आपापल्या पातळीवर काही जबाबदाऱ्या स्विकारल्या व त्याचा पाठपुरावा नियमितपणे घेण्याचे ठरले. या उजळणीच्या सत्राने बीजोत्सवाची सांगता झाली.

तुमचाच,
बीजोत्सव गट

अधिक माहितीसाठी संपर्क : निखील लांजेवार – ९३७२४७५०२५, आकाश नवघरे - ९७६६९१२७४५, किर्ती मंग्रुळकर – ९५५२५५६४६५, रुपींदर नंदा - ९८६०७३१६६६, प्राची माहूरकर – ९८२३६१२४६८, अनंत भोयर – ९०४९६४१४७४.

No comments:

Post a Comment